मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या महिन्यात बदलापुरात अत्याचाराच्या घटनेने राज्य हादरले होते त्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर पोलिसांनी केला आहे. सांगण्यात येत आहे की, अक्षय याने पोलिसांची रिल्हॉल्व्हर हिसकावली आणि पोलिसांवरच गोळीबार केला. याचदरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याला गोळी देखील लागली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत अक्षयला गोळी लागली, आणि त्याचा मृत्यू झाला… असा दावा देखील केला जात आहे.
अक्षय शिंदे हा बदलापूर येथील शाळेत सफाई कर्मचारी होता. अक्षय याच्यावर शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले. तेव्हा पासून अक्षय शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात होता. पण सोमवारी अक्षय याला कारागृहातून रिमांडसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जवळपास संध्याकाळी 6 च्या सुमारास एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला. मुंब्रा बायपासजवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने एपीआय नीलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावली . त्यानंतर अक्षय शिंदे याने नीलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली. दोन गोळ्या हवेत गेल्या. गोळी लागल्यानंतर निलेश मोरे यांनी देखील अक्षय याला जखमी केलं.
आरोपी अक्षय शिंदे आणि एपीआय निलेश मोरे गाडीत मागच्या सीटवर बसले होते. पुढे ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर पोलिस निरीक्षक संजय शिंदे बसले होते. संजय शिंदे यांनी गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर स्वसंरक्षणासाठी स्वतःची बंदूक काढली आणि अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी अक्षय शिंदे यांच्या चेहऱ्यावर लागली आणि जागीच अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. अक्षयने गोळीबार केला तेव्हा पोलिस दलातील चार सदस्य, दोन अधिकारी आणि इतर दोन लोक कारमधून प्रवास करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, संबंधित प्रकरणी जलद गतीने सुनावणी सुरु आहे. सर्व दोषींना शिक्षा होणार… असं देखील मुख्यमंत्री म्हणाले होते. पण एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. घडलेल्या घटनेमुळे राजकारणात देखील खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बदलापूर येथे घडलेल्या घटनेची चर्चा सुरु आहे.