यावल : प्रतिनिधी
शहरातील गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या महिलेस अत्यंत विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातीत साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या मागे गाडगेनगर वस्तीत राहणाऱ्या निर्मलाबाई शंकर वडर (५६) या २२ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास आपल्या घरात असताना त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला विषारी सापाने दंश केल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना नरेंद्र शिंदे व नातेवाईकांनी तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडली. येथून जळगाव येथे नेताना रस्त्यातच त्यांचा मूत्यू झाला. या घटनेची खबर मयत महिलेचा मुलगा रवींद्र वडर (३०) यांनी यावल पोलिस ठाण्यात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉ. राजेंद्र पवार हे करीत आहेत.
महिलेला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात नेताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. तेव्हा महिलेच्या नातलगांनी मृतदेह परत यावल रुग्णालयात आणला आणि या ठिकाणी उपचारात दिरंगाई केल्याचा आरोप त्यांनी रुग्णालय प्रशासनावर करीत संताप व्यक्त केला. रुग्णालयात नागरिकांची गर्दी झाल्याने पोलिसांनी या ठिकाणी येऊन रुग्णांच्या नातेवाइकांची समजूत काढली.