पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरदार सुरु केली असून नुकतेच बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मुख्यमंत्रीपदावरुन महायुती-मविआकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत तक्रवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचे बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत. गेली अनेक दिवस सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत येत आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी ठाकरे गटाकडून रश्मी ठाकरे तर राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे या मुख्यमंत्रीपदाच्या महिला दावेदार असल्याचे म्हटले होते. यामुळे आता या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसत आहे.
बारामती विधानसभेतून काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे. युगेंद्र पवार हे नेहमीच शरद पवार यांच्यासोबत असतात. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना भेटायला गेले होते. त्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये संपर्क वाढवला असून ते शरदचंद्र पवार पक्षाकडून मैदानात उतरतील आणि थेट अजित पवारांना आव्हान देतील, असा अंदाज आहे.