जळगाव : प्रतिनिधी
पती कामावर व पत्नी त्यांच्या मामाकडे श्राद्धच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या होत्या. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून रोख १५ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. २० सप्टेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकरणी जिल्हा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी परिसरातील वनविकास कॉलनीतील रहिवासी तुषार राजूभाई कसुरे (वय ३३) हे वास्तव्यास आहे. दि. २० रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी मामाकडे श्राद्धच्या कार्यक्रमासाठी गेल्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातून रोख १५ हजार रुपये, ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ५० हजारांचा नेकलेस, ५० हजारांची मंगलपोत, ५० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या, १० हजारांचे कर्णफुले असा एकूण दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
संध्याकाळी तुषार यांच्या पत्नी घरी आल्या त्या वेळी त्यांनी चोरीविषयी पतीला कळविले. त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता त्यांना घरातील ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी तुषार कसुरे यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.