जळगाव : प्रतिनिधी
बारमध्ये दगडफेक करीत गल्ल्यातून पाच लाख ७० हजार रुपये लुटून नेल्याप्रकरणी रोकड घेवून पसार झालेल्या सचिन अभयसिंह चव्हाण (२६, रा. शंकर आप्पानगर, पिंप्राळा) व अक्षय नारायण राठोड (२२, रा. यश नगर, पिंप्राळा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून ताब्यात घेतले. या संदर्भात शनिवारी (२१) सप्टेंबर) संध्याकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
महामार्गावर एन. एन. वाईन अॅण्ड बार या ठिकाणी रविवारी रात्री सचिन चव्हाण, राकेश जाधव, भोला उर्फ सुगर भोई, अक्षय उर्फ गंप्या राठोड यांनी पाच बियरची मागणी केली. मॅनेजरने पैशांची मागणी केली असता दगडफेक करीत गल्ल्यातून पाच लाख ७० हजार रुपये काढून पसार झाले होते. यात भोला भोई, राकेश जाधव या दोघांना या पूर्वीच अटक केली होती तर उर्वरीत दोघे फरार होते.
रोकड घेवून सचिन चव्हाण व अक्षय राठोड हे दोघे अमळनेरमार्गे धुळे, नाशिक, पुणे व मुंबई येथे पसार झाले होते. त्यांनी लुटलेले पैसे मौजमस्तीमध्ये उडविले. त्यानंतर ते पाळधी येथील साईबाबा मंदिरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी पोउनि दत्तात्रय पोटे, सहयक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील यांना सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ६८ हजार ५०० रुपये व दुचाकी हस्तगत करण्यात आली.