जळगाव : प्रतिनिधी
गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खत शेतकऱ्यांना विक्री हेतू उपलब्ध होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने कृषी विभागाच्या भरारी पथकाने नांद्रा, ता. जळगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर शुक्रवार दि. २० रोजी १५२ गोण्या उतरवत असताना छापा टाकून जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाचे गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी आवाहन केल्यानुसार गुजरात राज्यातील अवैध, विनापरवाना व बनावट खतांना आळा घालण्यासाठी नाशिक विभागातील गुण नियंत्रण शाखेने तपासणी सुरु केली आहे. त्यानुसार शुक्रवारी जळगाव जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांद्रा, ता. जळगाव येथे गुजरात राज्यातील खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी धीरज बढे, मंडळ कृषी अधिकारी अमित भोसले यांच्या पथकाने पाळत ठेवून ट्रक मधून मे. जेनिक केमटेक कॉर्पोरेशन कंपनीचे नाव लिहिलेल्या सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना छापा टाकून जप्त केल्या. या सेंद्रिय खतांच्या बॅगवर मे. जेनिक केमटेक कॉर्पोरेशन या खत कंपनीचे बोगस नाव टाकून शेतकऱ्यांना विक्री केले जात आहे. मे. दक्षकमल ट्रेडर्स, शहादा जि. नंदुरबारचे मालक संशयित चंद्रकांत पाटील हे में. जेनिक केमटेक कार्पोरेशन या कंपनीचे नाव टाकून सेंद्रिय खत शेतकऱ्यांना विक्री केली जात असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
याप्रकरणी अवैध, बनावट व विनापरवाना खत विक्री करणाऱ्या मे. दक्षकमल ट्रेडर्स, शहादा, जि. नंदुरबार यांचे मालक चंद्रकांत पाटील, जोधा पंपानिया, भरतभाई, दिनेश पाटील, महेश माटे, अलताफ शेख मो. हनीफ यांच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, खत नियंत्रण आदेश १९८५ अन्वये तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.