चाळीसगाव : प्रतिनिधी
वन अधिकारी असल्याचे सांगत वन रक्षक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील चौधरीवाडा भागातील निखिल सुरेश पगारे (३०) या तरुणाची रुग्णवाहिका चालक नामदेव वाघ याच्याशी ओळख झाली. वाघ याने नितीन पगारे हा वन विभागात आरएफओ असल्याचे सांगत वन विभागात वन रक्षक म्हणून नोकरी लावून देण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी केली. उद्यापर्यंत दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले त्याप्रमाणे सुरेश पगारे यांनी या दोघांना दि.१७ सप्टेंबर रोजी १ लाख रुपये दिले.
निखिल पगारे याने हा प्रकार पोलिस दलात कार्यरत असलेल्या आपल्या मित्राला सांगितला. या पोलिस मित्राने खात्री करून सांगतो असे सांगितले. त्यानंतर पोलिस मित्राने निखिल पगारे यास सांगितले की, तुझी फसवणूक झाली असून, नितीन हा तोतया अधिकारी असून, त्याच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. त्यानंतर दि. १८ रोजी सायंकाळी निखिल पगारे हा पोलिसांसोबतच उर्वरित पैसे देण्यासाठी गेला. त्यांनी संशयित नितीन पगारे याला ताब्यात घेतले. त्यानंतर साथीदार नामदेव वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.