जळगाव : प्रतिनिधी
सोने मोडून आलेले ४० हजार रुपये व नातेवाइकांकडून घेतलेली रक्कम असे एकूण ८३ हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले असताना चोरट्यांनी ते लांबविले. ही घटना रविवारी (१५ सप्टेंबर) रात्री भाऊंच्या उद्यानासमोर घडली. याप्रकरणी १९ सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कापड व्यावसायिक इंद्रकुमार प्रेमचंद साहित्या (५३, रा. सिंधी कॉलनी) यांनी काही सोने मोड दिली व त्यातून ४० हजार रुपये आले होते, तसेच काही नातेवाइकांनी त्यांच्या पत्नीकडे रक्कम दिलेले होती. असे एकूण ८३ हजार त्यांच्या पत्नीने पर्समध्ये ठेवले व ही पर्स दुचाकीच्या डिक्कीत ठेवून साहित्य व त्यांची पत्नी भाऊंच्या उद्यानात गेले. परत आले त्या वेळी डिक्कीत पर्स नव्हती.
याप्रकरणी साहित्या यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध १९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक हेमंत कळसकर करीत आहेत.