नगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी दोन गटात हाणामारी होत दंगलीच्या घटना काही ठिकाणी घडल्या असतांना नुकतेच इंदूरीकर महाराजांनी नगर जिल्ह्याच्या अकोले येथे एका कीर्तनात तरुणांना सल्ला दिला आहे.
इंदूरीकर महाराज म्हणाले कि, तुम्ही गरीब राहा, वेळ पडली तर घरोघरी फिरून कुल्फी विका, आणखी काही व्यावसाय धंदा करा, पण दंगलींच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला त्यांनी नगर जिल्ह्याच्या अकोले येथे त्यांच्या किर्तनात दिला आहे. तसेच धर्माच्या नावाखाली गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका, धर्मांचं भांडवल करु नका, असे सांगत राजकारण्यांचेही कान टोचले आहेत.
इंदूरीकर महाराज म्हणाले, माझ्याएवढी किर्तने महाराष्ट्रात कोणी केली नसतील. महिन्यात ८० तरी किर्तने होतात. यातून आलेल्या अनुभवावरून सांगतो, तरुणांनो तुम्ही दंगलीच्या भानगडीत पडू नका. दंगलीत अडकला तर दहा वर्षे शिक्षा आहे. आतापर्यंत गरीबांचीच मुले दंगलीत अडकली आहेत. श्रीमंत आणि राजकारण्यांचे कोणी यात अडकत नाही. धर्माचा अभिमान नाही का? असे कुणी तुम्हाला विचारले तर त्याला सांगा तुमचा धर्म माईकवर आहे. आमचा धर्म आमच्या हृदयात आहे.
पुढे बोलताना इंदूरीकर महाराज म्हणाले, धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका. दंगलीत अडकवून आमच्या पोरांचे करिअर उध्वस्त करू नका, असे राजकारण्यांना सांगितले पाहिजे, असेही इंदुरीकर म्हणाले. तरुणांना सल्ला देताना ते म्हणाले, तुम्ही दंगलीत पडू नका. तुम्ही गरीब राहा, वेळ पडली तर घरोघरी फिरून कुल्फी विका, आणखी काही काम धंदा करा, या असल्या गोष्टींमध्ये पडू नका. ४० टक्के तरुण पुढार्यांच्या मागे फिरून भिकारी झाली आहेत. राजकारण्यांवर निशाणा साधत इंदूरीकर महाराज म्हणाले, ज्यांनी आयुष्यभर पोरांचा वापर भोंगे बांधायला केला, ते नोकरी देऊ म्हणतात, पण देत नाहीत. केवळ वापरून सोडून देतात. इंदूरीकर महाराज त्यांच्या प्रवचानाच्या व किर्तनाच्या माध्यमातून समाजाला द्यानाचे सल्ले देतात. कधी कधी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ते अनेकदा चर्चेतही राहतात.