धुळे : वृत्तसंस्था
शहरातील देवपुरातील प्रमोदनगर येथे राहणाऱ्या खतविक्रेत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यापूर्वी त्याने पत्नी व दोन मुलांना विष देऊन संपवले हाेते. दोन दिवसांनंतर घराचे दार उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जहाल विषामुळे तिघांचे मृतदेह कुजल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे गूढ अद्याप कायम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खतविक्रेता प्रवीणसिंह मानसिंह गिरासे, पत्नी दीपांजली (४४), मुलगा सोहम ( १८) व मितेश (१४) अशी मृतांची नावे आहेत. धुळ्याच्या पारोळा रोडलगत प्रवीणसिंह हे कुटुंबासह राहत होते. त्यांचे कामधेनू फर्टिलायझर नावाचे दुकान अाहे. रविवारपासून ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. गुरुवारी सकाळी त्यांचे नातलग घरी आल्यावर चौघांचे मृतदेह आढळून आले. प्रवीणसिंह हे गळफास घेतलेल्या स्थितीत तर त्यांच्या पत्नी दीपांजली, मुलगा सोहम व मितेश हे निपचित जमिनीवर पडलेले दिसून आले. घरात दुर्गंधी येत होती. याचा अर्थ किमान दोन दिवसांपूर्वी ही दुर्घटना घडल्याचा संशय आहे. पोलिसांना प्रवीण यांच्याजवळ दोन ओळींची चिठ्ठी मिळून आली. प्रवीण यांनी शेतात फवारणी करण्याचे विषारी औषध पत्नी व मुलांना खाद्य पदार्थातून दिले. या तिघांच्या मृत्यूनंतर त्यांनीही गळफास घेतला. प्रवीणसिंग यांचे लहान भाऊ हे पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे.
मृत प्रवीणसिंह यांच्याजवळ चिठ्ठी सापडली. त्यात ‘प्रिय अण्णा स्वमर्जीने आत्महत्या करत आहोत. कृपया माफ करावे,’ एवढाच उल्लेख आहे. घटनेपूर्वी त्यांनी बहिणीलाही मेसेज करून भेटायला ये, असे सांगितल्याचेही समोर आले आहे. आत्महत्येचे कारण मात्र अजून स्पष्ट झालेले नसल्याचे तपास अधिकारी तुषार देवरे यांनी सांगितले.