रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सावदा येथे सामूहिक कार्यक्रमात एका तरुणाला लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. हैदर शेख मंजूर (३५, रा. सावदा) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैय्यद मोईन सैय्यद सलीम (वय २४, रा. बडाआखाडा सावदा, ता. रावेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. बुधवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता बाजारपट्टा भागात सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सैय्यद मोईन हा देखील आलेला होता. त्यावेळी हैदर शेख मंजूर हा देखील त्या कार्यक्रमात होता. दरम्यान, हैदर शेख मंजूर याने सैय्यद मोईन याच्याकडे रागाने पाहिले याचा जाब विचारला असता हैदर शेख याने हातात लोखंडी वस्तू सैय्यद मोईन याच्या अंगावर उगारली.
हा वार वाचविण्याच्या प्रयत्नात असताना लोखंडी वस्तू सैय्यद मोईन याच्या डोक्याला लागली. यात सैय्यद मोईन हा जखमी झाला. याप्रकरणी सैय्यद मोईन याने दिलेल्या फिर्यादीवरून हैदर शेख मंजूर (रा. बडाआखाडा सावदा, ता. रावेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल सानप हे करीत आहेत.