जळगाव : प्रतिनिधी
आताच एमपीडीएमधून सुटून आलो आहे. पाच बार लुटले तरी माझे कोण काही करू शकले नाही, असे म्हणत चाकूचा धाक दाखवून बारच्या गल्ल्यातून पाच लाख ७० हजार रुपये रोकड लुटून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयिताला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तिघे फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजराल पेट्रोल पंपाशेजारील एन. एन. बारमध्ये रविवारी रात्री चारजण आले व त्यांनी फुकट बिअरची मागणी केली. परंतु, व्यवस्थापक अमोल कोळी यांनी नकार दिला. त्यावरून वाद घालत पाच लाख ७० हजार रुपये लुटून नेले होते. रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक फौजदार अतुल वंजारी, संजय हिवरकर, राजू मेढे, विजय पाटील, हरिलाल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता चार जणांची नावे निष्पन्न झाली. हल्ला करण्यासह रोकड नेणाऱ्यांमध्ये सचिन चव्हाण, राकेश जाधव, भोला ऊर्फ सुगर भोई, अक्षय ऊर्फ गंप्या राठोड यांचा समावेश होता. व्यवस्थापक अमोल कोळी यांनी जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली, त्यावरून रविवारी रात्री चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भोला भोई व राकेश या दोघांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे.