चाळीसगाव : प्रतिनिधी
दि.१४ सप्टेंबर रोजी गणेशपूर येथील रिंकेश नंदू मोरे या १३ वर्षीय तरुणाचा बिबट्याचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या तसेच मयताच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या.
त्यानुसार मयत रिंकेश मोरे च्या कायदेशीर वारसांना एकूण २५ लाखांची मदत मंजूर करण्यात आली. आज दि.१६ सप्टेंबर रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व मंजूर २५ लाखांच्या मदतीपैकी पहिल्या टप्प्यातील १० लाखांच्या मदतीचा धनादेश मयत सुपूर्द केला. यावेळी उप वनसंरक्षक प्रवीण ए., वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, सरपंच चंद्रकांत देसले, पोलीस पाटील भागवत पाटील, एस.डी.पाटील सर, शरद पाटील, उन्मेष पाटील यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
घटना घडल्याच्या दोनच दिवसात मयताच्या वारसांना अर्थसहाय्य मिळाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली संवेदनशीलता व प्रशासनाने आपली गतिमानतेचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे.
लोकप्रतिनिधी या नात्याने मोरे कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभा – आमदार मंगेश चव्हाण
स्व.रिंकेश च्या दुर्दैवी निधनामुळे मोरे कुटुंबियांचे झालेले नुकसान न भरून निघणारे असले तरी शासन – प्रशासनातील दुवा या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून २५ लाखांच्या मदतीच्या माध्यमातून मोरे कुटुंबियांना आधार देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. यापैकी १५ लाख रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले जाणार असून भविष्यात याचा उपयोग रिंकेशच्या कुटुंबियांना होणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मोरे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.