मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असतांना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आरक्षण रद्द करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची वादग्रस्त घोषणा सोमवारी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात कळीच्या आरक्षणाच्या मुद्यावर आपले मत व्यक्त केले होते. देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आरक्षण संपवण्याची भाषा करण्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
आमदार संजय गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रात व देशात आरक्षणाच्या मागणीसाठी आग लागली आहे. मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभे करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी व इतर प्रवर्गांना आरक्षणाची तरतूद केली. असे असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याचे विधान केले. या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचा खरा चेहरा व पोटातील मळमळ ओकून दाखवली.
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आरक्षण व संविधान धोक्यात असल्याचे फेक नरेटिव्ह पसरवले. त्यातून त्यांनी दिनदुबळ्या समाजाची मते घेतली. त्यानंतर आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ त्यांना सर्वच मागासवर्ग, आदिवासी, दलित व इतरांचे आरक्षण संपवायचे आहे. त्यामुळे आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास मी 11 लाख रुपयांचे बक्षीस देईल, असे संजय गायकवाड सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.