धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पथराड येथे वायरिंगचे काम करीत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाला. त्यामुळे शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पथराड, ता. धरणगाव येथे रविवारी सकाळी ९ वाजता घडली. समाधान भागवत जेठे पाटील (२९) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत जेठे पाटील खासगी कंपनीत रोजंदारीवर कामाला होता. रविवारी त्याचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात कामाला गेलेले होते व पत्नी नातेवाइकांच्या घरी गेली होती. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेजारील राजेंद्र पाटील यांच्या घरी वीजपुरवठ्यात व्यत्यय आला. त्यांनी समाधान यास दुरुस्त करण्यासाठी बोलावले. तो दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाला आणि शॉक लागल्याने तो खाली कोसळला. त्याला लागलीच रिक्षा करून शासकीय रुग्णालयात आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. समाधान याच्या पश्चात आई- वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.