अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पातोंडा येथील एका गरीब कुटुंबातील तरुण शेतकऱ्याचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवार सायंकाळी घडली. ईश्वर हिरामण बिरारी (४७) असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ईश्वर बिरारी हा शेतात शेत वखरणीसाठी गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात असलेल्या भोकर झाडाची फांदी वखरनीच्या बैल औतास नडत होती. ती फांदी तोडण्यासाठी ईश्वर बिरारी झाडावर चढत असताना त्याचा पाय घसरून खाली पडल्याने बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेतच त्याला उपचारासाठी चोपडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती त्याचे चुलत भाऊ शिवदास भगवान पाटील व प्रवीण बिरारी यांनी दिली. याबाबत शिवदास पाटील यांनी चोपड़ा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व बहीण असा परिवार आहे.