पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील शिवरे दिगर येथील सारंग माध्यमिक विद्यालयात आयोजित भंडाऱ्यानंतर तब्बल ७० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांवर पारोळा कुटीर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला.
मिळालेली माहिती अशी कि, शाळेत भंडाऱ्याचा कार्यक्रम दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी भोजन केले आणि घरी परतले. मात्र काही वेळानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. हळूहळू अनेक विद्यार्थ्यांना अस्वस्थता जाणवू लागली. पालकांनी घाबरून या मुलांना तातडीने पारोळा कुटीर रुग्णालयात आणले, जिथे जवळपास ७० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले.
रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी तातडीने विद्यार्थ्यांवर उपचार केले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अन्नातील काही दूषित पदार्थामुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.