यावल : प्रतिनिधी
फुलगावजवळच्या हॉटेलवरून रात्रीच्या वेळी ट्रक चोरीस गेल्याप्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात चोरीत फिर्यादी ट्रक चालकाचाच सहभाग असल्याचे समोर आले असून, या ट्रक चालकासह अन्य दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक अरबाज खान तस्लीम (वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (एम. एच. ४३ – /वाय ८०८७) भुसावळ-वरणगाव महामार्गाने आणत असताना वरणगावनजीक महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नसमोर ५ सप्टेंबर रोजी रात्री तो थांबला होता. मात्र, रात्री ट्रक चोरीला गेल्याचे सकाळी त्याने मालकाला – कळविले. याप्रकरणी ८ रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्रे फिरवून ट्रक चोरीच्या घटनेतील फिर्यादी चालक अरबाज खान तस्लीम व त्याचा साथीदार क्लिनर तस्लीम अयुब खान (५४, रा. पाळधी) तसेच युसूफ खान अमीर (वय ४८, रा. जामनेर) यांना बुधवारी, ११ रोजी अटक केली. अद्याप ट्रक न मिळाल्यामुळे त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.