भुसावळ : प्रतिनिधी
प्लॉटच्या वादातून दोघ भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यामध्ये मोठ्या भावाने लहान भावाच्या डोके भिंतीवर आपटून व बॅटने मारहाण करीत प्रदीप जयसिंग इंगळे (वय ४८) यांचा निघृण खून केला. ही घटना फॅक्टरीतील क्वार्टर श्री टाईप ४४ मध्ये घडली. यातील संशयीत सतिष जयसिंग इंगळे (वय ५१) याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव फॅक्टरीत पॅकींग विभागात सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले प्रदीप इंगळे यांचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी फॅक्टरीच्या परिसरात मुलासह विभक्त राहतात. सतिष इंगळे हे बुधवारी काही कामानिमित्त फॅक्टरीतील स्टेट बँकेत आले हाते. यावेळी बँकेसमोरच असलेल्या वसाहतीच्या क्वार्टर क्रमांक ४४ मधील तो लहान भाऊ प्रदीप यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी दोन्ही भावांमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास कौटुंबीक प्लॉटच्या आर्थिक कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की सतीष इंगळे यांनी लहान भाऊ प्रदीप इंगळे यांचे डोके भिंतीवर आपटले आणि त्यांच्या डोक्यात लाकडी बॅटने जोरदार वार केल्याने प्रदीप याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती दर्यापूरचे पोलीस पाटील गिरीष पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात माहीती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सतिष इंगळे यांनी तुकाराम नगरात एक प्लॉट घेतला होता. त्यातील एकहजार स्क्वेअर फुट प्लॉट प्रदीप इंगळे यांनी घेतला होता. त्यासाठी लाख रुपये दिले होते. ते पैसे परत मागण्यावरुन त्या दोघ भावांमध्ये वाद होवून त्यातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दर्यापुरचे पोलीस पाटील गिरीष पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून संशयीत सतिष इंगळे यांना पोलीसांनी अटक केली. त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.