बीड : वृत्तसंस्था
गेल्या चार महिन्यापासून राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बीड जिल्ह्यात देखील एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. केज येथील एका महाविद्यालयीन तरुणीला लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. मोबाईलवर पीडितेच्या नग्न फोटो व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर पुन्हा वारंवार १० ते १२ वेळा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे नऊ महिन्या पूर्वी जानेवारी २०२४ मध्ये केज येथील एक लातूर येथे वैद्यकीय पात्रता परीक्षा नीटची तयारी करीत असलेली महाविद्यालयीन १९ वर्षाची तरुणी ही लातूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबली होती. तिच्या ओळखीचा व सोशल मीडियावर ओळख झालेला सूरज गुंड नावाचा एक तरुण तेथे आला. तो तिला म्हणाला की, तो पण लातूरला जात आहे. असे म्हणून त्याने त्या युवतीला त्याच्या चारचाकी कारमध्ये बसविले.
केजपासून पुढे ७० किमी अंतरावर असलेल्या रेणापूर येथील एका हॉटेलवर त्याने गाडी थांबवली. त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने त्या हॉटेलच्या एका रूममध्ये घेऊन गेला. त्याने रूमचा दरवाजा आतून बंद केला. त्यावेळी तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबले. तिच्या इच्छे विरुद्ध बळजबरीने अत्याचार केला. त्याने मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर त्याने तिने जर हा प्रकार कुणाला सांगितला तर ते सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने तिला लातूर येथील हॉस्टेलवर नेवून सोडले. नंतर तो तिला वारंवार फोन करून तिचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे आणि तिच्या आई-वडीलासह नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविण्याची धमकी देत होता. तिला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत त्याने १० ते १२ वेळा लैंगिक अत्याचार केला. भीतीपोटी व कुटुंबाच्या इज्जतीपोटी पीडित तरुणी हे सर्व सहन करीत होती. त्या नंतर एके दिवशी सूरज गुंड याने ते सर्व व्हिडिओ आणि फोटो हे तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर पाठवून दिले.
त्यानंतर आई-वडिलांनी त्या तरुणीला याचा जाब विचारल्या नंतर तिने सर्व प्रकार सांगितला. दि. ११ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या सर्व प्रकारची कल्पना दिली. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक यांचे लेखनिक पोलीस नाईक संतोष गित्ते यांच्या मदतीने पीडित तरुणीची तक्रार नोंदवून घेतली. केज पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे सूरज गुंड याच्यावर पाळत ठेवून त्याच्या मुसक्या आवळल्या.
तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या सूरज गुंड याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४८५/२०२४ भा. न्या. सं. २०२३ अधिनियम कलम ६४(१), ६४(२)(एम), ३३२(ब), ११५(२), ३५२, ३५१(१), ३५१(२) यासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(२) (पाच), ३(२)(व्ही ए), ३(१)(आर), ३(१)(एस) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे ६६, ६६(ई) नुसार बलात्कार, ॲट्रॉसिटी आणि आयटी ॲक्टनुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार गंभीर असल्याने आरोपी फरार होऊ नये याची दक्षता घेत केज पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे सूरज गुंड याच्यावर पाळत ठेवून त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.