जळगाव : प्रतिनिधी
घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भोईटेनगरमधील गौरी प्राइड अपार्टमेंटमधील शिक्षकाचे घर फोडून ३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भोईटेनगर परिसरातील रहिवासी मयूर बाळासाहेब देशमुख (३६ ) हे शिक्षक पत्नी व दोन मुलांसोबत शनिवारी अडावद येथे उत्तरकार्यासाठी गेले होते. चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत, घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. १ लाख ४० हजार रुपये किमतेचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ७० हजार रुपये रोख रक्कम, १४ हजार रुपये किमतीचा सोन्याचा तुकडा, तर काही चांदीचे दागिने मिळून ३ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. सोमवारी शेजारच्यांना कडी-कोयंडा पडलेला दिसला. त्यांनी देशमुख यांना माहिती दिली. देशमुख परिवार घरी पोहचल्यानंतर, त्यांनी शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.