मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली असल्याचा उल्लेख केला होता. मात्र त्यांच्या या उल्लेखावरून आता विरोधकांनी टीका केली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याला इतिहासाचे विकृतीकरण म्हटले आहे.
या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढल्याबद्दल कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टीळकांनी शोधून काढली, यावरून आव्हाड यांनी भागवत यांच्यावर टीका केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, ‘मोहन भागवतजी, इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली. वास्तविक पाहता, छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढल्याबाबत कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नाहीत. ही समाधी त्यांनी अत्यंत कष्टाने शोधून काढली. झाडाझुडपात लपलेली ही समाधी शोधत असताना तेथील मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना त्रासदेखील दिला होता. पण, या मनुवाद्यांना न जुमानता छत्रपती शिवरायांची समाधी व्यवस्थित करून घेतली ती फक्त आणि फक्त महात्मा जोतिबा फुले यांनीच ! आपण जे बोलता त्यालाच आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो.’