नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मोठ्या शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच नागपुरात एका भरधाव वेगाने आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक देत दोन जणांना गंभीर जखमी केले. यात इतर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या ऑडी कारने हा अपघात झाला, त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नागपुरातील हिट अँड रन घटनेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पोलिसांनी आतापर्यंत या घटनेचा तपास कसा सुरु आहे, याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ तारखेला रात्री अपघात झाला. यानंतर अर्जुन हावरे, रोनित चित्तमवार, संकेत बावनकुळे यांना काल चौकशीसाठी तिघांनाही बोलवलं होतं. या तिघांचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री उशिरा जामीनावर त्याची सुटका करण्यात आली.
संकेत हा ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवर बसलेला होता. या घटनेनंतर आम्ही चौकशीला सुरुवात केली आहे. अर्जुन हावरे हा यावेळी कार चालवत होता. त्याच्या बाजूच्या सीटवर संकेत बावनकुळे हा बसला होता. तर रोनित चित्तमवार हा मागच्या सीटवर बसला होता. हे तिघेही एका हॉटेलमध्ये जेवल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी घरी जाताना वाटेत हा अपघात घडला. या घटनेनंतर संकेत बावनकुळे हा घटनास्थळी आढळून आला नाही. तर या घटनेवेळी अर्जुन हावरेने नशा केलेली होती. डॉक्टरने याबद्दल पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. त्याचे ब्लड सॅम्पलही पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर अर्जुन आणि रोनित या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे.. त्या दोघांचेही ब्लड सॅम्पल तपासासाठी पाठवले आहे.
या घटनेवेळी गाडीचा वेग किती होता, काय याची आम्हाला कल्पना नाही. आम्ही RTO आणि ऑडीच्या काही एक्सपोर्ट लोकांना बोलवून याचा तपास करु. याप्रकरणी फक्त अर्जुनवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोनित किंवा संकेत या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नागपूर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.