जळगाव : प्रतिनिधी
जळगाव, धुळे जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातून दुचाकी चोरणारा दीपक सुमाऱ्या बारेला (२९, रा. कर्जाणा, ता. चोपडा) हा गावात आल्याची माहिती मिळताच त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (९ सप्टेंबर) पत्रकार परिषदेमध्ये दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संदीप पाटील आणि प्रवीण मांडोळे हे पेट्रोलिंग करत असताना दीपक बारेला हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची त्यांना माहिती मिळाली. याविषयी त्यांनी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळविले. त्यांनी वरील दोघांसह नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागूल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकूर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. चोरटा कर्जाणा गावात आल्याची माहिती मिळताच पथकाने दीपक बारेला याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने पाचोरा, पारोळासह धुळे जिल्ह्यातील मोहाडी तसेच बडवाणी जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.