बाल शौर्य पुरस्कार विजेत्या चिमुकलचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगावच्या शिवांगी काळे हिने प्रसंगावधान राखल्यामुळे तिची आई आणि बहिणीचे प्राण वाचले असून यामुळे तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या माध्यमातून शिवानीने जिल्ह्याचे नाव जगभरात उंचावल्याचे कौतुकोदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. शिवानीच्या घरी जाऊन सन्मान केल्यानंतर बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तिच्या धैर्याचे, शौर्याचे आणि प्रसंगावधानाचे तोंड भरून कौतुक केले. तर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवांगीसह राज्यातील बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांचा विशेष सत्कार करावा असा प्रस्ताव आपण मांडणार असल्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.
जळगाव येथील शिवांगी काळे या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकललीला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन या प्रकारात राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी तिच्या आईला पाणी तापवतांना विजेचा शॉक लागला. याप्रसंगी मृत्यूच्या दारात उभी असणारी आपली आई आणि अजाणपणे आईकडे जाणारी बहिण या दोघींचे प्राण तिने प्रसंगावधान राखून विजेचा स्वीच बंद करून वाचविले. तिच्या या शौर्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटल्यानंतर आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शिव कॉलनीतील शिवांगी काळे हिच्या घरी जाऊन तिचा आणि तिच्या पालकांचा सत्कार केला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर ललीत कोल्हे, सौ. सरीता माळी-कोल्हे आदींची उपस्थिती होती. ना. गुलाबराव पाटील यांनी शिवांगीचा सत्कार करून तिच्या पालकांशी संवाद साधला. आजच्या पिढीतील पुले ही स्मार्ट आणि चुणचणीत आहेत. अगदी आपल्याला सुध्दा पटकन इलेक्ट्रीक स्वीच बंद करणे सुचले नसते. मात्र या चिमुरडीला हे सुचून तिने आई व बहिणेचे प्राण वाचविल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.