जळगाव : प्रतिनिधी
बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाकडून रोख एक लाख रुपये व चार लाख रुपयांचा धनादेश घेणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना शनिवारी (७ सप्टेंबर) घडली. या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आले आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच शहरातील एकाकडे केलेली अधिक रकमेची मागणी पूर्ण न झाल्याने धमकी देणाऱ्या दुसऱ्या एका महिलेलादेखील अटक करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणान्या ५५ वर्षीय ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाची वकील राठोड (३०, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) या हॉटेल चालकाशी ओळख झाली. नंतर राठोड याने या व्यावसायिकाची एका महिलेशी ओळख करून दिली. त्यानंतर व्यावसायिकाचे महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याबदल्यात महिलेला पैसेही दिले. काही दिवसांनी महिलेने काही ना काही कारणासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार व्यावसायिकाने या महिलेला ७१ हजार ५०० व ओळख करून देणारा वकील राठोड याला १५ हजार रुपये दिले. या प्रकरणी व्यावसायिकाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले. पुढील तपास सपोनि माधुरी बोरसे करीत आहेत.