जळगाव : प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील अडावद येथे गेल्या आठवड्यात इसमाच्या खूनप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांनी खुनाची कबुली दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी (७ सप्टेंबर) पत्रकार परिषदेमध्ये दिली. गांजाच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्यांना ‘तुम्ही येथे का बसले,’ असा जाब विचारल्याने जगदीश फिरंग्या सोलंकी (४५, रा. अडावद) याचा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी अडावद येथे जगदीश सोलंकी याचा मृतदेह आढळून आला होता व त्यांच्या शरीरावर मारहाणीचे व्रण होते. याप्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे इरफान अब्दुल तडवी, शाहरूख इस्माईल तडवी, शेख मोर्डन शेख मजिद, कलिंदर रशीद तडवी या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता गांजाच्या नशेत जगदीश सोलंकी याला शिवीगाळ केल्याने तो त्यांना ‘तुम्ही गांजा पिणारे येथे का बसले’, असे म्हणाला. त्याचा राग आल्याने चौघांनी सोलंकी यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले. तो पळू लागल्याने चौघे त्यास कब्रस्थानमधील बांधकाम केलेल्या व्हरांड्यात घेऊन गेले व लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. कलिंदर तडवी याने दोरीने गळा आवळून ठार मारले अशी माहिती चौघांनी पोलिस जबाबात दिली. चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.