जळगाव : प्रतिनिधी
गाय ही आमची माय आहे. गायीच्या दूधात भेसळ करणारी आमची औलाद नाही. मात्र चाळीसगावात ज्यांनी कत्तलखाने उभारण्यासाठी परवानग्या आणल्या त्या उन्मेश पाटलांनी दूध संघावर बोलू नये असा पलटवार जिल्हा दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी आज केला. दरम्यान जिल्ह्यातील दूध उत्पादकांना ७० पैसे बोनस देण्याची घोषणाही त्यांनी केली.
जळगाव-भुसावळ महामार्गावरील एका हॉटेलात गुरूवारी जिल्हा दूध उत्पादक संघाची वार्षिक सभा चेअरमन आ. मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला मंत्री गिरीश महाजन, संचालक संजय पवार, प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत पुढे बोलतांना चेअरमन मंगेश चव्हाण यांनी दूध संघाचा आढावा सादर केला. ते म्हणाले की, आम्ही दूध संघ ताब्यात घेण्यापूर्वी दूध संघ ९ कोटी ६२ लाख रुपये तोट्यात होता. नवीन संचालक मंडळाने कार्यभार स्वीकारल्यानंतर हा तोटा २ कोटी ८८ लाख रुपये कमी केला. या वर्षात साडेनऊ कोटी नफा झाला आहे. मागचा तोटा वगळता ७० पैसे प्रतिलीटर बोनस दूध उत्पादकांना देण्याचे ठरले आहे. बोनसच्या प्रश्नावर प्रमोद पाटील म्हणाले की, दूध संघाकडून १ रुपया बोनस दूध उत्पादक शेतर्कयांना अपेक्षित होता, पण ७० पैसेच मिळाले आहेत. मागच्या वर्षी तो मिळाला नव्हता. पुढच्या वर्षी एक रुपयापेक्षा जास्त मिळेल, असे सूतोवाच चेअरमन मंगेश चव्हाण यांनी केले आहे. दूध संघात भेसळ होत नाही, अशी स्पष्टोक्तीही संचालक प्रमोद पाटील यांनी दिली.