जळगाव : प्रतिनिधी
खासगी रुग्णालयामध्ये कामावर गेलेल्या अनिता रमेश दप्तरी (७३, रा. गुरुकृपा कॉलनी) या परिचारिकेच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने- चांदीचे दागिने, देवी-देवतांच्या मूर्ती व पूजा साहित्य चोरून नेले. स्वयंपाकाच्या ओट्याखाली भांडे ठेवलेल्या गोणीत एका कापडामध्ये दागिने गुंडाळून ठेवलेले असतानादेखील चोरट्यांनी ते चोरून नेले. ही घटना गुरुवारी भोईटेनगरात उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भोईटे नगरातील गुरुकृपा कॉलनीमध्ये राहणाऱ्या अनिता दप्तरी या एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून कामाला आहेत. बुधवारी (४ सप्टेंबर) संध्याकाळी त्या मंदिरात हरिपाठासाठी गेल्या व तेथून त्या रुग्णालयात कामाला गेल्या. मध्यरात्री चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाकाच्या ओट्याच्या खाली भांडे ठेवलेल्या गोणीमध्ये असलेला दोन तोळ्यांचा हार, २६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, दीड ग्रॅम वजनाची चेन, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच देवघरात ठेवलेला चांदीच्या मूर्ती, चांदीचे पूजा साहित्य चोरून नेले. सकाळी ही घटना शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी दप्तरी यांना माहिती दिली. त्या घरी आल्या व पाहणी केली असता वरील मुद्देमाल चोरीला गेल्याचे समजले. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी शहर पोलिसांसह श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनी तपासणी केली.