मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या महिन्यात महायुती सरकारने ‘लाडकी बहिण’ योजना सुरु केली होती. त्यानंतर महायुती सरकारमध्ये सुरु असलेले वाद चव्हाट्यावर येत असतांना नुकतेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एकमेकांविरोधात तक्रार करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचे श्रेय एकटेच घेत आहेत, असा आरोप इतर पक्षातील मंत्र्यांनी केला आहे. त्यावर आपण लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एसओपी आणू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना शांत केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून या योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या जनसमान यात्रेनिमित्त लाडकी बहिणी योजनेचे श्रेय ते घेताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी बॅनर, पोस्टर आणि जाहिरातीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा प्रचार अजित पवार यांच्यामार्फत होत आहे. मात्र यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश करण्यात येत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील मंत्री नाराज होत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यातच आता मंत्रिमंडळ बैठकीत देखील या मुद्द्यावरून मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.
अजित पवार यांची जनन्समान यात्रा हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम आहे. त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या जाहिराती आणि बॅनरवर केवळ अजित पवार यांचे फोटो असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील किंवा इतर लोकांनी आक्षेप घ्यावा, असे वाटण्याचे काहीही कारण नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी म्हटले आहे. ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी अनाथांचा नाथ म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे होर्डिंग लागले होते. म्हणजेच ते होल्डिंग लावण्याची तयारी देखील आधीच झाली होती. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकट्याने श्रेय का घ्यावे? असे म्हणालो नव्हतो, असे देखील उमेश पाटील यांनी म्हटले आहे.