यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील आडगावजवळील श्रीक्षेत्र मनुदेवी रस्त्यावर दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून २१ वर्षीय तरुणावर तिघांनी चाकूने हल्ला केला होता. या गुन्ह्यातील तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीस त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्यावर भुसावळ येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरावरून शनिवारी दर्शन घेऊन प्रशांत किशोर धनगर (वय २१, रा. चहार्डी, ता. चोपडा) हा तरुण घरी जात होता. दरम्यान शनी मंदिराजवळील फॉरेस्टच्या गार्डनसमोर दुचाकीचा धक्का लागला म्हणून चेतन संभाजी सोनवणे वय २०, रा. खेडी, ता. जळगाव), खुशाल शत्रुघ्न कोळी (वय २१, रा. पंढरपूर नगर एमआयडीसी, जळगाव) व सूरज नाना पाटील (वय २०, रा. कुसंबा, ता. जळगाव) या तीन तरुणांनी वाद घातला व शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यातील एकाने धारदार चाकूने प्रशांतच्या पोटावर वार केला. याप्ररकणी तिघांना अटक केली होती. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार सागर कोळी करीत आहेत.