मुंबई : वृत्तसंस्था
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या राज्यातील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दरम्यान राहुल गांधींच्या हस्ते पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. यानंतर सांगलीत जाहीर सभेला संबोधित करताना, “…काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या डीएनएमध्ये आहे”, असे स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, पूर्वी राजकारण व्हायचे, पण आज वैचारिक लढा सुरू आहे. भारताला सामाजिक प्रगती हवी आहे. पण त्याचा फायद काही निवडक लोकांनाच मिळत आहे. देशातील २०, २५ उद्योगपतीचे १६ लाख कोटी रूपये कर्ज सरकारने माफ केले. उद्योगपतींचे कर्ज माफ झाले, शेतकऱ्यांचेही झाले पाहिजे, अशी घणाघाती टीका राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर केली. काँग्रेसच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे ७० कोटी कर्ज माफ केले होते, असेही खासदार राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सावरकरांच्या मुद्यावरून मोदींनी केलेल्या टीकेला राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले, चुकीचे काम करणारे माफी मागतात. चुक केली नाही तर माफी मागायची वेळच येत नाही. त्यामुळे चुकीचा जीएसटी, नोटाबंदी बाबत माफी मागा, तरुणांना रोजगार देऊ शकलो नाही म्हणून माफी मागा, देशात चुकीचा जीएसटी, नोटाबंदीबाबत माफी मागा, असे म्हणत पीएम मोदींवर राहुल यांनी निशाणा साधला आहे. आम्हाला द्वेषाचं राजकारण करायचं नाही तर प्रेमाचं आणि एकीचं राजकारण आम्हाला हवंय, असेही खासदार राहुल गांधी यांनी जाहीर सभेमध्ये स्पष्ट केले.