पुणे : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राज्यात सुरु असतांना नुकतेच अजित पवारांच्या महिला पदाधिकाऱ्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहे. नुकतेच विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून हा नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणी स्पष्ट मत मांडत पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यास तीव्र विरोध केला आहे. तुम्ही एकाच महिलेला किती पदे देणार? असा कळीचा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून आपल्या 3 नेत्यांना विधान परिषदेवर पाठवणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे व सिद्धार्थ कांबळे यांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट अजित पवार यांच्याकडे न्यायाची याचना केली आहे. यामुळे राष्ट्रवादीपुढे बाका प्रसंग उभा राहिला आहे.
रूपाली ठोंबरे पाटील गुरुवारी एक फेसबुक पोस्ट आणि ट्विट करून आपले म्हणणे मांडले. त्या म्हणाल्या की, एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? कालपासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत. त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत. त्यामुळे सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा. इतर महिलांना समान संधी द्यावी, ही विनंती असेल.