जळगाव : प्रतिनिधी
शेतामध्ये झालेल्या रस्त्याच्या वापराच्या वादातून इसम महिलेच्या अंगावर धावून गेला. त्यांच्यासोबत असलेल्या तिघांनी महिलेसोबत झटापट करुन तिचा विनयभंग केला. ही घटना दि. ३ सप्टेंबर रोजी पिलखेडा गावातील शेतात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात ५३ वर्षीय महिला वास्तव्यास असून त्यांचे पिलखेडा शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतात दि. ३ सप्टेंबर रोजी शेत रस्ता तयार करण्यात आला. तो रस्ता वापराच्या वादातून प्रकाश धोंडू कोळी हा लाकडी दांडा घेवून महिलेच्या अंगावर धावून गेला. तर त्याच्यासोबत असलेल्या शांताराम चैत्राम कोळी (साळुंखे), महेंद्र शांताराम कोळी, जितेंद्र शांताराम कोळी यांनी महिलेसोबत वाद घालीत झटापट केली. यावेळी महेंद्र कोळी याने महिलेचा हात पकडला तर जितेंद्र कोळी याने महिलेचा पदर ओढून त्यांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. यामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने महिलेने दि. ३ रोजी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित प्रकाश धोंडू कोळी, शांताराम चैत्राम कोळी, महेंद्र शांताराम कोळी, जितेंद्र शांताराम कोळी सर्व रा. पिलखेडा, ता. जळगाव यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे हे करीत आहे.