मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये मोठे राजकारण सुरु असतांना नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी उपाय सुचवला आहे. समुद्रकिनाराच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे. कारण स्टेनलेस स्टीलला गंज चढत नाही, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा यासाठी मी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मी मुंबईत जेव्हा 55 उड्डाणपूल बांधले तेव्हा एका माणसासोबत फेरफटका मारताना उड्डाणपुलासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडावर कोटींग पावडर निघून गेले होते. आणि त्याला गंज चढला होता. त्यानंतरच्या काळात मुंबईतील सर्व पुलांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे देखील गडकरी यांनी म्हटले आहे. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळ्याची उभारणी करताना स्टेनलेस स्टील वापरले असते तर हा पुतळा पडला नसता, असे देखील गडकरी यांनी म्हटले आहे.
भारतीय नौदलाच्या वतीने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटी ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात आला होता. जयदीप आपटे या शिल्पकाराने हा पुतळा उभारला होता. मात्र, गंज चढल्यामुळे तो पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही स्ट्रक्चरवर लोखंड ऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.