जळगाव : प्रतिनिधी
सेवानिवृत्त परिचारिकास्नेहलता अनंत चुंबळे (वय ६०, रा. खोटेनगर, जळगाव) यांचा ३० लाखांच्या रकमेसाठी खून करून, मृतदेह तापी नदीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व बांधकाम विभागातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून त्यांना ११ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खून करून संशयितांनी फेकून दिलेल्या महिलेचा मृतदेह अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे आव्हान आहे. मात्र, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींनी महिलेकडून लुबाडलेली तीस लाखांची रक्कम तसेच ज्या चार चाकी वाहनांमध्ये महिलेच्या खून केल्याचा संशय आहे. ती चार चाकी देखील जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चुंबळे या साळवा ता. धरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होत्या. त्या एप्रिल २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मुलगा समीर देशमुख यांच्याकडे नाशिकला वास्तव्यास होत्या. १७ ऑगस्ट रोजी ग.स. सोसायटीच्या सभेसाठी त्या जळगावला आल्या होत्या. २० ऑगस्ट रोजी त्यांनी सायंकाळी ७:१५ वाजता पती संजय देशमुख यांना फोन करून, रात्री नाशिक स्टेशनवर घ्यायला येण्यास सांगितले. मात्र, त्या रात्री पोहचल्या नाहीच. दोन दिवस शोध घेतल्यावर त्यांच्या मुलाने जळगाव तालुका पोलिस ठाण्याला २२ ऑगस्ट रोजी मिसिंगची नोंद केली होती.