जळगाव : प्रतिनिधी
के. सी.ई. सोसायटी जळगाव द्वारा संचालित नंदुदादा बेंडाळे यांच्या संकल्पनेतून खान्देशातील विद्यार्थ्याना विविध खेळ प्रकारात पारंगत होता यावे म्हणून एकलव्य क्रीडा संकुलाची निर्मिती झाली आहे. या मध्ये विविध खेळांचे प्रकार शिकविले जातात.यातूनच अनेक विद्यार्थी राष्ट्रीय ,राज्य व जिल्हास्तराव आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.
या अनुषंगाने खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान एम जे कॉलेज चा एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती ,बॉक्सिंग ,धनुर्विद्या,हॉकी ,खोखो ,कबड्डी ,वेटलिफ्टिंग,हॉलीबॉल ,फुटबॉल, ऍथलेटिक या दहा क्रीडा प्रकारांकरिता शारीरिक क्षमता चाचणी तसेच खेळातील कौशल्य विकास यांचे मूल्यमापन होणार असून त्याकरिता एकलव्य क्रीडा संकुल चे ४० प्रशिक्षक व ३० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातून जवळपास ८ ते १० हजार विद्यार्थी आपला सहभाग नोंदवतील अशी माहिती मु. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तथा एकलव्य क्रीडा संकुल चे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर यांनी दिली आहे.
या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री, माननीय श्रीमती रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. यावेळी त्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार असून, क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या बाबतीत चर्चा करतील.
खेलो इंडिया KIRTI कार्यक्रमाचा उद्देश खेळाडूंच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे हा आहे. या शिबिरामुळे जळगाव आणि परिसरातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे. या शिबिरात विविध क्रीडा प्रकारांसाठी कौशल्ये तपासण्यात येणार आहेत. खेळाडूंच्या व तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांच्या सहभागाने या शिबिराचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल, असा विश्वास मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे यांनी व्यक्त केला आहे.