मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून त्यातच इच्छुक उमेदवार आपापली उमेदवारी फायनल करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे उंबरठे झिजवताना दिसून येत आहेत. यात सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांतील नेत्यांचा समावेश आहे. पण आता भाजपमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 24 नेते अस्वस्थ असून, त्यापैकी चार-पाच जण पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची माहिती उजेडात आली आहे. स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना याची पुष्टी केली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत समावेश झाल्यानंतर अनेक मतदारसंघांतील राजकीय चित्र बदलले आहे. कोल्हापूरच्या कागल मतदार संघाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ करतात. त्यांच्यामुळे सरजितसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जात आहेत. नेत्यांच्या या भाजपसोडीविषयी याविषयी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपकडे 24 नेते असे आहेत जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड ताकदीने आव्हान देऊ शकतात. आता या 24 जणांना आपल्या राजकीय वाटचालीची चिंता वाटत आहे. यामुळे पक्षात थोडी अस्वस्थता आहे. यापैकी 405 जण शरद पवार यांच्या पक्षात जातील. पण तिथे गेल्यानंतरही तुतारी लावणारे अनेकजण आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजप प्रत्येकाशी संवाद साधत आहे. आमची समरजितसिंह घाटगे यांच्याशीही चर्चा झाली. हर्षवर्धन पाटील यांच्याशी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा चर्चा केली. समरजितसिंहला थांबायचे नव्हते. कारण, त्यांना कोणत्याही स्थितीत विधानसभा लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय घेतला. भाजपमध्ये जे इनमिंग झाले, त्या ठिकाणी तेवढ्या ताकदीचे उमेदवार नव्हते. त्यामुळे त्या नेत्यांना पक्षात घेतले गेले. कारण, जेवढे प्रभावी नेतृत्व पक्षात येते तेवढा पक्षाचा विस्तार होतो.