जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर कसबेत बैलपोळा फोडण्याच्या अर्धा तास अगोदर अचानक अज्ञातांकडून दोन गटांत दगडफेकीची घटना घडल्याने तणावपूर्ण वातावरण झाले. यात एका गटाचे १३ जण जखमी झाले असून, पैकी चार जणांना जळगाव येथे हलविण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयातून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहूर कसबेत दपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानकपणे दगडफेकीची घटना घडली. घटनास्थळावरून काही जण पळताना जि.प. शाळेच्या खोलीचे पत्रे खाली कोसळल्याने काही युवक खाली पडले. पोलिस निरीक्षक सचिन सानप व पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून शांतता निर्माण केली. त्यानंतर, साडेचार वाजता नियोजित पोळा फोडण्यात आला. या सर्व घटनेत दगडफेकीचे कारण समोर आले नाही. मात्र, एका गटाकडून पहूर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रारीसाठी कार्यवाही सुरू होती. या घटनेमुळे पोळा सणाला गालबोट लागल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाल्याने पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, जिजाबराव कोकणे, अमोल देशमुख यांनी परिस्थिती हाताळली. दोन्ही बाजूने उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.