चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील विरवाडे येथील रहिवासी तथा अभियंता नितीन प्रवीणसिंग पाटील (४५) यांचा ३१ रोजी पाय घसरल्याने गूळ धरणात बुडून मृत्यू झाला. ते विद्युत अभियंता होते. ते सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मालापूर येथील गूळ धरणावर फिरायला गेलेले होते. तेथे त्यांचा पाय घसरल्याने धरणाच्या १५ मीटर पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विरवाडे गावात घटना समजताच कुटुंबीयांसह नातेवाईक आणि ग्रामस्थांनी गूळ धरण गाठले. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनीही पीएसआय बापू साळुंखे, पोकॉ. किशोर माळी आदींना घटनास्थळी पाठविले. परंतु धरणात पाणी खूपच असल्याने शव बाहेर काढता आले नाही. सावळदे (ता. शिरपूर) येथील पट्टीचे पोहणारे कैलास शिरसाठ, नारायण शिरसाठ, सुनील शिरसाठ, श्रीराम शिरसाठ, उत्तम सोनवणे, नारायण भिल यांनी दोन तास शर्थीचे प्रयत्न करून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नितीन पाटील यांचा मृतदेह धरणातून बाहेर काढला. रविवारी सकाळी विरवाडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.