मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती, नाना पटोले यांच्यासह नेतेमंडळी सहभागी झाले आहेत.
मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज महायुती सरकारविरोधात ‘जोडे मारा’ आंदोलनाची हाक दिली होती. आज हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून तिथून सर्वजण गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मविआचे नेते जमले असून तेथे ‘सरकारला जोडे मारा’ आंदोलन केले जात आहे.
पंतप्रधान मोदींनी माफी कशासाठी मागितली शिवरायांचा पुतळा पडला म्हणून, की पुतळा उभारताना भ्रष्टाचार झाला म्हणून? माफी मागून काही होणार नाही. कारण महाराजांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. अपमान करणाऱ्यांना गेट आऊट ऑफ इंडिया करण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी देवासारखे आहेत. त्यांचा पुतळा कोसळला आणि त्याबरोबर आमची भक्ती, सन्मान आणि स्वाभिमान तिथेच कोसळला. एवढा अनादर होऊनही याला पाठिंबा देणाऱ्या नेते आणि राजकीय पक्षांचा निषेध करायचा नाही तर आणखी काय करणार? असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले, “पंतप्रधान भावूक झाले होते, त्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले पण महाराष्ट्र सरकारने जे व्यक्त करायला हवे होते, ते त्यांनी केले नाही. उलट त्यांनी विरोधकांना अडवून धरायला सुरुवात केली. आम्ही या मुद्द्याचे राजकारण करत आहोत असे म्हणणे चुकीचे आहे. हा सर्वात भावनिक मुद्दा होता ज्याचा महाराष्ट्राने यापूर्वी कधीच अनुभव घेतला नव्हता. आम्ही सर्व काही लोकशाही मार्गाने केले आहे. कोण राजकारण करत आहे आणि कोण स्वाभिमानाने रस्त्यावर उतरले आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. सरकारने राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.