नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच एलपीजी गॅस ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल केला असून आज १ सप्टेंबरपासून दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
१९ किलो व्यावसायिक LPG सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १,६९१.५० असेल. ही दरवाढ अनेक घसरणीनंतर होत आहे. याआधी काही महिने व्यवसायांना काहीसा दिलासा मिळाला होता. जुलैमध्ये प्रति सिलिंडरच्या किमती ३० रूपयांनी कमी झाल्या होत्या, त्याआधी जूनमध्ये ६९.५० आणि मे मध्ये १९ रूपयांची घट झाली होती. १ जूनच्या कपातीने किरकोळ किंमत १ हजार ६७६ खाली आणली होती.