नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात सत्ताधारी अनेक जिल्ह्यात ‘लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम सुरु असून या मंचावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. नुकतेच नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम पार पडला. अजित पवार म्हणाले, हे विरोधक एवढे वर्ष सत्तेत होते, तेव्हा तुम्हाला का नाही सुचले महिलांना मदत करण्याचे? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले काही विरोधक आमच्यावर टीका करत आहेत.
अजित पवार म्हणाले, तुम्ही फक्त महायुतील साथ द्या, लाडकी बहीण योजना कुणी माईचा लाल बंद पाडू शकणार नाही. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर पर्यंतचे पैसे तुम्हाला मिळतीलच. मात्र नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होईल. आम्ही तिघे कुठे धनुष्यबाण, कुठे कमळ, तर कुठे घड्याळ या चिन्हावर 288 जागांवर उभे राहू. त्यावेळी तुम्ही महायुतीला भरभरून मतदान करा. मी शब्द देतो, ही योजना आम्ही पुढील पाच वर्ष सुरू ठेवू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.
अजित पवार म्हणाले, आम्ही वचन पाळणारे लोक आहोत आणि वचनपूर्ती करणारे हे सरकार आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने अडीच कोटी महिलांना या योजनेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. आता या योजनेत जवळपास 1 कोटी 60 लाख बहिणी लाभार्थी झाल्या आहेत. पुढचे टप्पेही लवकरच होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्या बहिनींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जो पर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे, अरे हाय कोर्टमध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू. आम्हाला या रखीची आण आहे काहीही झाले तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही. आम्ही प्रयत्नांची शर्थ करून हाय कोर्टात केस लढवू. पण भगिनींनो यांची नियत समजून घ्या, आज कुठे बहीणींच्या खात्यात पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागले.