एरंडोल तालुक्यातील धारागीर येथून बनावट दारू साठा जप्त
धरणगाव प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुक्ल विभागाने धरणगाव शहरात बनावट दारू तयार करणाऱ्याला अटक केली होती. या प्रकरणात पथकाने तालुक्यातील पाळधी येथून अजून एकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान एरंडोल तालुक्यातील धारागीर येथे टाकलेल्या छाप्यात दीड लाखाचा बनावट दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
सचिन पाटील रा. पाळधी ता. धरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शनिवारी २१ जानेवारी रोजी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने धरणगाव शहरात छापा टाकून बनावट दारू निर्मिती कारखाना उध्वस्त केला होता. या कारवाईत संशयित आरोपी भूपेंद्र पाटील याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सचिन पाटील याचे नाव सांगितले.
जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांचे नेतृत्वाखाली निरीक्षक सी.एच पाटील , दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे, आनंद पाटील, जवान एन.व्ही. पाटील, ए.व्ही.गावंडे, एम.डी.पाटील, के.पी.सोनवणे, राहूल सोनवणे यांनी संशयित आरोपी सचिन पाटील याला ताब्यात घेतले आहे तर भूपेंद्र पाटील यांच्या माहितीनुसार धारागिर येथे प्लॉट एरियात जनावरांच्या गोठ्यातून लपवलेले १ लाख ६० हजार रुपये किमतीचे बनावट टॅंगो पंच देशी दारूचे ५५ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच या दारूच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी ६ लाखांची मिनिट्रक ( एम एच – १८ – ए ए ८६८४ ) यावेळी जप्त करण्यात आली आहे. तर याअगोदर या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला ११ लाख २ हजार ४०० रुपये किमतीचा आणि काल पोलीस कोठडीतील आरोपीने दिलेल्या माहितीनंतर ७ लाख ७३ हजार ४०० असा १८ लाख ७५ हजार ८०० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आलेला आहे.