जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात घरात मुलेमुली लपंडाव खेळत असताना, एका ११ वर्षीय मुलीला घरात कोंडून ४० वर्षीय व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शहरातील रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला मुंबईतून पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ६ वाजेच्या दरम्यान, रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत संशयित आरोपी सिद्धार्थ वानखेडे (वय ४०) याच्या घराजवळ ११ वर्षाची मुलगी आणि काही मुले लपंडाव खेळत होती. मुलगी संशयित आरोपीच्या घरात लपायला गेली असता, सिद्धार्थ वानखेडे घरात आला. त्याने त्या मुलीला पाहिल्यानंतर घराचा दरवाजा बंद केला. घरातील सर्व लाइटदेखील बंद करत मुलीवर अत्याचार केले.
पीडित मुलीने आरडाओरड केल्याने संशयिताने मुलीचे तोंड दाबून, तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत शांत राहण्यास सांगितले. ही माहिती काही दिवसानंतर पीडित मुलीच्या आई- वडिलांना कळल्यानंतर बुधवारी रामानंदनगर पोलिस स्टेशनला संबंधितावर भारतीय न्याय संहिता कलमानुसार ६३ (बी), ६५ (२)७४, ७६, १२७ (१), ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित सिद्धार्थ वानखेडे मुंबईला पळून गेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने त्याला गुरुवारी मुंबईतून अटक केली. शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाईच्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी दिली आहे.