जळगाव : प्रतिनिधी
गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप धनगर यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट) रोजी काढले. या प्रकरणात संबंधिताची प्राथमिक चौकशी करण्यात येणार असून निलंबन काळात धनगर यांना मुख्यालयात रहावे लागणार आहे.
रविवारी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाली होती. त्यानंतर कार काढताना दोन दुचाकींना धक्का देत त्या पाडल्या व काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाले होते. या प्रकरणी सोमवारी (२६ ऑगस्ट) रोजी वृत्तपत्रात प्रकाशित केले होते.
हे पोलिस कर्मचारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील असल्याचे समोर आले असून त्या विषयी अहवाल पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाला. त्यानुसार पो.कॉ. संदीप धनगर हे मद्यपान केल्यानंतर वाद घालत असल्याने त्यांना दोघे जण समजवत होते, अशी माहिती मिळाली. गणवेशातच मद्यपान केल्याचा ठपका ठेवून धनगर यांना निलंबित करण्यात येऊन प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी कोणाची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचेही पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले. असे असले तरी या प्रकाराची जिल्हाभरात चांगलीच पोलिसांसह नागरिकांमध्येही चर्चा रंगली होती. पोलिस प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई देखील केली आहे.