मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढत असतांना नुकतेच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमाखदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा एकूण 43 फूट उंच होता. त्यात जमिनीपासून बांधकाम 15 फूट चबुतरा, तर त्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता. हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.