छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन दिवसांत सततधार पाऊस सुरु असून सरासरीपेक्षा २४%अधिक पावसाची नोंद करण्यात आली असून शुक्रवारी रात्री मराठवाड्यातील ४० मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत सरासरी ३४.२ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्टमधील पावसाची मोठी तूट पडली होती. ती आता २१.८% राहिली आहे. मात्र राज्यातील पावसाने सरासरी ओलांडली आहे. राज्यात सरासरीपेक्षा २४% अधिक पावसाची नोंद झाली आहे. २४ ऑगस्टपर्यंत राज्यात सरासरी ७५६ मिमी पावसाची नोंंद होते, यंदा त्यापेक्षा अधिक ९४० मिलिमीटर पाऊस कोसळला. तसेच आगामी ४८ तासांत पुन्हा जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, मात्र हिंगोली, अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी असल्याने त्या ठिकाणी पावसाने सरासरी देखील गाठलेली नाही. राज्यात सर्वात कमी पाऊस हिंगोली येथे पडला असून तेथे ४८% तूट आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्यात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. तसेच २४ ते २६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १४ जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच रविवारी सह्याद्रीपर्वतरांगावर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांना पूरपरिस्थिती राहणार आहे.