जालना : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी भीषण आग व स्फोटाच्या घटना घडत असतांना नुकतेच जालना एमआयडीसीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. गजकेसरी स्टील नावाच्या कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याने यात 20 कामगार जखमी झाले आहेत. तर यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये स्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडल्याने 20 जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे. तर काही कामगारांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात आणण्यात आले.
घटना घडताच कंपनीला बंद करून आतमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मोबाईल हिसकावण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपपोलिस अधीक्षक पीयूष निपाणीसह चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलिसांनी धाव घेऊन घटनेची चौकशी सुरु केली आहे. जालना अद्योगिक वसाहतीत नेहमी किरकोळ घटना घडत असतात, याची माहिती लपवली जाते. तसेच पोलिसही माहिती देण्यास टाळाटाळ करतात, अशी तक्रार काही स्थानिक लोकांनी केली आहे.