जळगाव : प्रतिनिधी
शहरातील तालुका पोलिस रात्री फिरायला निघालेल्या कल्पना ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर संजय पाटील (वय ५४, रा. खोटेनगर, निमखेडी शिवार, जळगाव) या महिलेल्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची अडीच तोळ्याची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लांबविल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना पाटील या खोटेनगरात कुटुंबासह वास्तव्याला आहेत. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते फिरायला निघाले होते. तालुका पोलिस ठाण्यासमोर पाण्याच्या टाकीजवळ चालत असताना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ दुचाकी हळू केली आणि काही कळण्याच्या आतच कल्पना पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पोबारा केला. यावेळी महिलेने जोरदार आरडाओरड केली. मात्र, चोरटे पसार झाल्याने कोणाच्या हाती लागले नाही. महिलेने तातडीने पोलिस ठाणे गाठून घडलेली हकीकत सांगितली पोलिसांनीही लगेच या भागात चोरट्यांचा शोध घेत काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. रात्री उशिरा चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा वाढल्या असून पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.